श्रीमती अश्विनी भिडे, भाप्रसे
व्यवस्थापकीय संचालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
श्रीमती अश्विनी भिडे, महाराष्ट्र प्रवर्गातून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. नागरी सेवा परीक्षांमधून त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत १९९५ मध्ये निवड झाली. संपूर्ण देशातून महिला उमेदवारांमधून प्रथम येण्याचा सन्मानही त्यांना लाभला आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांना वीस वर्षे सेवेचा संपन्न अनुभव असून जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणून त्यांनी काम पहिले आहे.
नागरी पायाभूत सुविधा क्षेत्रामधील कामाचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून त्यांच्या कारकिर्दीत मुंबईत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आले आहेत. भारत आणि मुंबईतील पहिला ८.२ कि.मी. लांबीचा मोनोरेल प्रकल्प आणि मुंबई शहराला वेग प्राप्त करून देणारा १७ कि.मी. लांबीचा पूर्व द्रुतगती महामार्ग त्यांच्याच कारकिर्दीत उभारण्यात आला. या पूर्व द्रुतगती महामार्गावर १२ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचा समावेश आहे. या मार्गावर शहरातील पहिले जुळे बोगदे बांधण्यात आले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा (टी२) सहार उन्नत मार्ग, दहिसर व मिलन सबवे येथील दोन महत्वाचे रेल्वे ओलांडणी पुल, लालबाग येथील महत्वपूर्ण २ कि.मी. लांबीच्या उड्डाणपुलासाहित ८ उड्डाणपुलांचे बांधकामसुद्धा त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचे परिणामकारक नेतृत्व व नियोजन तसेच विविध भागधारकांमध्ये समन्वय घडवून विस्थापित होणाऱ्या कुटुंबांचे व धार्मिक स्थळांचे मोठ्या प्रमाणावरील पुनर्वसन सुद्धा हा अतिशय महत्वाचा भाग होता.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मुंबई मेट्रो १ साठी आवश्यक हक्क मार्ग (Right of way) कालबद्ध रीतीने उपलब्ध करून देणे, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करणे, त्याचप्रमाणे मिठी नदीचा विकास, तळोजा एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सार्वजनिक – खासगी भागीदारीत राबविणे व मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चे (२२ कि.मी. लांबीचा सी लिंक) प्रकल्प सार्वजनिक – खासगी भागीदारीत राबविणे अशा जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनी पार पाडल्या आहेत.
नागरी पायाभूत सुविधांच्या विकसनाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे ‘जायका’ च्या (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) साह्याने उभारण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो -३ प्रकल्पाची धुरा, त्यांच्या खांदयावर सोपवण्यात आली आहे.